Sugarcane Export Ban | ऊस निर्यातीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! ऊस उत्पादकांना होणार मोठा फायदा
महाराष्ट्र सरकारने ऊस निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला आहे. हा निर्णय मागे घेण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात येत आहे. एका आठवड्यापूर्वी राज्य सरकारनं महाराष्ट्रातील ऊस बाहेरच्या राज्यात जाऊ न देण्याचा आदेश काढला होता. या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. त्यांनी राज्य सरकारला खुले आव्हान दिले होते की, “आम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे आम्ही ऊस नेणार. तुमच्यात हिंमत असेल तर आडवा.” राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यंदाच्या मोसमात राज्यातील ऊसाची तोळामासाची परिस्थिती पाहता राज्यातील साखर कारखानदारांकडून परराज्यातील कारखान्यांना ऊस घालण्यास बंदीचे आदेश देण्यात आले होते. मात्र या निर्णयाला शेतकरी संघटनांनी कडाडून विरोध केला होता. राज्य सरकारच्या या निर्णयावरून सरकार आणि शेतकरी संघटना आमनेसामने आल्या होत्या.
राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलन उभारलं जाईल असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला होता. शेतकरी संघटनेच्या विरोधामुळे आणि संभाव्य संघर्षाची धास्ती घेऊन राज्य सरकारनं ऊस निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला. या निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पूर्ण श्रेय जात असल्याचे सांगण्यात येत आहे.